दादर (प.) परिसरात सलग ३ दिवस अतिक्रमण विरोधी धडक कारवाई

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – दादर पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील परिसरात उद्भवलेल्या अतिक्रमणांवर पालिकेच्या 'जी उत्तर' विभागाद्वारे १६ मे पासून दररोज धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस व रेल्वे पोलीस यांच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या या कारवाई दरम्यान गेल्या ३ दिवसात तब्बल १६ ट्रक माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पादचा-यांना पदपथांवरुन आवागमन करणे अधिक सुकर होण्यासोबतच रस्त्यावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होत आहे. अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण निर्मूलन विषयक ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार आहे, अशी माहिती 'जी उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

पालिका परिमंडळ २ चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनात 'जी उत्तर' विभागात १६ मे पासून अनधिकृत फेरीवाले, शेडधारी अनधिकृत विक्रेते इत्यादींच्या विरोधात अधिक तीव्र स्वरुपाची कारवाई करण्यात येत आहे. दादर पश्चिम परिसरातील रानडे रोड, छबीलदास गल्ली, न. चि. केळकर मार्ग, डॉ. डिसिल्व्हा मार्ग, जावळे मार्ग, दादर कबुतरखाना, सेनापती बापट मार्गावरील केशवसूत उड्डाण पूलाखालील भाग, दादर पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल आदी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. १६ व १७ मे रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान प्रत्येक दिवशी ५ ट्रक याप्रमाणे दोन दिवसात १० ट्रक माल जप्त करण्यात येऊन एकूण १३० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. तर १८ मे रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ६ ट्रक माल जप्त करण्यात येऊन ११५ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. यानुसार ३ दिवसातील कारवाई दरम्यान १६ ट्रक भरेल एवढा माल जप्त करण्यात येऊन २४५ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या मालामध्ये प्रामुख्याने तयार कपडे, कटलरी सामान, चामड्याचे सामान, हातगाड्या, मोबाईल कव्हर्स, भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश आहे.ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील १५ पोलीस कर्मचा-यांचा ताफा घटनास्थळी कार्यरत होता. यासोबतच रेल्वे पोलीसांचे सहकार्य पालिकेला या कारवाईसाठी लाभले होते. या कारवाईसाठी पालिकेचे ४० कामगार – कर्मचारी - अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते, अशी माहिती बिरादार यांनी दिली आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget