पुणे : पुणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू मानल्या गेलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची आत्ताची वास्तू पूर्णपणे पाडून नवीन वास्तू उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आत्ताची वास्तू नेस्तनाबूत करुन नवीन इमारत बांधण्याची खरंच गरज आहे? असा सवाल उपस्थित करत या योजनेवर काही रंगकर्मींना आक्षेप घेतले आहेत.
पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर ही पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा सांगणारी वास्तू. मात्र आता 50 वर्षानंतर ही वास्तू पाडून तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं थिएटर होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पु. ल. देशपांडे यांच्या कल्पनेतून साकारलं. त्यामुळे ही वास्तू फक्त पुणेकरांसाठीच नाही तर समस्त नाट्यप्रेमींसाठी महत्त्वाची आहे.
हे सांस्कृतिक केंद्र पुनर्विकसित करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर काही कलाकारांनी आक्षेप घेतला आहे. नाटककार अतुल पेठे,
ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी या निर्णयावर नापसंती दर्शवली आहे.
1962 साली संभाजी बागेच्या जागेत बालगंधर्व रंगमंदिर उभारण्यात आलं आणि 1968 सालापासून इथे नाटक नांदू लागलं. 50 वर्षांनंतर आता या वास्तूची ‘एक्स्पायरी’ झाल्याने आता ‘अपडेटेड’ इमारत उभं राहणं गरजेचं आहे, अशी पालिकेची भूमिका आहे. नवीन इमारतीचा आराखडा हा कलाकारांच्या सल्ल्यानेच तयार केला जाईल अशी ग्वाही पालिकेकडून देण्यात आली आहे.
Post a Comment