दररोज १ हजार किलो कच-यावरील प्रक्रियेतून होत आहे गांडूळखत निर्मिती
गांडूळ व खताचे आपोआप विलगीकरण होणारा पहिलाच प्रकल्प !
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – भायखळा येथील 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' राणीच्या बागेत तयार होणारा पालापाचोळा, जैविक कचरा इत्यादीं बाबत सुयोग्य कचरा व्यवस्थापन साध्य करण्याच्या दृष्टीने मुंबई पालिकेने आता राणीच्या बागेतच दररोज तब्बल १ हजार किलो एवढ्या कच-यापासून गांडूळखत निर्मिती करावयाचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकल्पाची पाहणी केली.यावेळी राणीच्या बागेचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) सुधीर नाईक, घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार, प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी संचालक डॉ. संजय त्रिपाठी, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पारंपारिक गांडूळ खत प्रकल्पांमध्ये खतनिर्मिती झाल्यावर खत व गांडूळ वेगळे करण्यासाठी चाळण्याची गरज आहे मात्र पालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत गांडूळांच्या वर्तणुकीचा अभ्यास करुन गांडूळखत निर्मितीसाठी एक अभिनव प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पामध्ये खतनिर्मितीनंतर खत व गांडूळ यांचे विलगीकरण करण्याची गरज नसणारा हा या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. ज्यामुळे खत तयार झाल्यानंतर त्याचा लगेच वापर करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रकल्पातून तयार होणारे गांडूळखत व जीवामृत पालिकेच्याच उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी यांनी दिली आहे.
बागेत होतो दररोज एक हजार किलो जैविक कचरा तयार होतो
भायखळा पूर्व परिसरात पालिकेचे 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' राणीची बाग हे सुप्रसिद्ध उद्यान व प्राणीसंग्रहालय असून ४८ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या या उद्यान व प्राणिसंग्रहालयात अनेक वृक्ष, झाडी, प्राणी, पक्षी इत्यादी आहेत. या उद्यानात झाडांचा पालापाचोळा, फांद्या, प्राण्यांना देण्यात आलेल्या भोजनाचे अवशेष, प्राण्यांचे मलमूत्र यासारखा दररोज सुमारे १ हजार किलो एवढा जैविक कचरा तयार होत असतो. हा कचरा आतापर्यंत पालिकेच्या क्षेपणभूमीवर दररोज पाठविण्यात येत होता. ज्यामुळे वहन खर्चासोबतच या कच-याचा पर्यावरणपूरक उपयोग करण्यावर देखील मर्यादा येत होत्या.
1387 चौरस फूटाच्या जागेत प्रकल्प
राणीच्या बागेत मोठ्या प्रमाणात तयार होणा-या या कच-याचा पर्यावरणपूरक व सुयोग्य वापर व्हावा यादृष्टीने या कच-यापासून गांडूळखत निर्मिती करावयाचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार पालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाशी संलग्न असणा-या श्री-आस्था महिला बचत गटाच्या सहकार्याने हा प्रकल्प आता कार्यान्वित करण्यात आला आहे. राणी बागेच्या मुख्य अंतर्गत प्रवेशद्वाराजवळ असणा-या सुमारे १३८७ चौरस फूटाच्या जागेत हा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.
गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामध्ये गांडूळखत तयार झाल्यानंतर त्यातील खत व गांडूळ वेगळे करण्यासाठी ते चाळावे लागते. ही प्रक्रिया काही प्रमाणात वेळ खाऊ असल्याने अनेकदा अशा प्रकल्पांच्या यशावर मर्यादा येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन प्राणीसंग्रहालयातील प्राणीशास्त्रज्ञांशी चर्चा करुन व गांडूळांच्या वर्तणूकीचा अभ्यास करुन या प्रकल्पाच्या बांधकामाचे आरेखन स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत तयार करण्यात आले होते. त्यानुसारच या अभिनव प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले आहे, अशी माहिती सुभाष दळवी यांनी दिली आहे.
9 हौद तयार
'गांडूळ' हे दमट व ओल्या जागेकडे आकर्षित होत असतात. हे तत्व लक्षात घेऊन या प्रकल्पातील गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असे ९ हौद तयार करण्यात आले आहेत. या हौदांचा खालचा एक फूटाचा भाग हा तुलनेने अधिक दमट व ओलसर राहील याची काळजी घेण्यात येते. ज्यामुळे ६ ते ८ आठवड्यात खत तयार झाल्यानंतर यातील गांडूळे ही हौदाच्या खाली भागात असणा-या १ फूटांच्या थरात राहतात व वरील भागात केवळ गांडूळखत असते. ज्यामुळे गांडूळ व खत वेगळे करण्यासाठी चाळण्याची गरज नसते
5 ते 7 आठवयांमध्ये कचऱ्याचे रुपांतर
खत निर्मिती प्रकल्पाच्या कार्यवाही अंतर्गत राणीच्या बागेतून गोळा होणा-या कच-याचे प्रथम वर्गीकरण केले जाते. त्यानंतर उपलब्ध झालेल्या जैविक कच-याचे अधिक गतीने विघटन व्हावे, या करिता या कच-याची भूकटी केली जाते. ही भूकटी सुरुवातीला शेड व मातीच्या थरामध्ये ठेऊन कुजविली जाते. त्यानंतर साधारणपणे १० दिवसानंतर ही कुजविलेली भुकटी गांडूळ खतांसाठीच्या हौदांमध्ये टाकण्यात येते. त्यानंतर पुढील ५ ते ७ आठवड्यांमध्ये या कच-याचे रुपांतर गांडूळखतामध्ये होते
15 हजार लीटर जीवामृत
गांडूळखत निर्मिती प्रकल्पामध्ये दररोज सुमारे १ हजार किलो कचरा टाकण्यात येत आहे. यानुसार वर्षभरात ३ लाख ६५ हजार किलो कच-यापासून ४० ते ५० हजार किलो गांडूळखताची निर्मिती होते दररोज साधारणपणे ४० ते ५० लीटर एवढे जीवामृत देखील या प्रकल्पातून प्राप्त होत आहे. या जिवामृताचा देखील गांडूळखताप्रमाणेच उपयोग होतो. वर्षभरात साधारणपणे १५ हजार लीटर एवढे जीवामृत देखील या प्रकल्पातून प्राप्त होत असतात या प्रकल्पामुळे सुयोग्य व पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन साध्य होण्यासोबतच कचरा वहन खर्चात देखील बचत करणे शक्य झाले आहे. त्यासोबतच या प्रकल्पातून प्राप्त होणारे गांडूळ खत व जीवामृत याचा वापर पालिकेच्याच उद्यानांमध्ये करण्यात येणार असल्याने उद्यानांच्या खत विषयक खर्चात देखील काही प्रमाणात बचत साध्य होणार आहे
येथे संपर्क साधावा
राणीच्या बागेत उभारण्यात आलेल्या अभिनव प्रकारच्या गांडूळखत निर्मिती प्रकल्पाच्या धर्तीवर आपल्या सोसायटीच्या परिसरात एखादा प्रकल्प उभारवायाचा झाल्यास इच्छुकांनी पालिकेच्या विभाग कार्यालयातील घन कचरा व्यवस्थापन खात्याशी संपर्क साधावा. तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी दळवी यांच्याशी सकाळी ११ ते ५ या वेळेत ९८३३-५७८-९९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Post a Comment