र-थायी समिती अध्यक्ष पालिका प्रशासनाला पाठीशी घालतात
मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेत शिवसेना पक्षाची एक हाती सत्ता आहे या पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना स्थायी समितीत शिवसेनेच्या नगरसेवकांची प्रशासनाकडून चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी नगरसेवकांना प्रशासन फसवत असताना त्यांच्याच पक्षाचे स्थायी समिती अध्यक्ष मात्र प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचे चित्र पालिका स्थायी समितीच्या बैठकीत सर्वाना पाहायला मिळाले. अध्यक्ष रमेश कोरगावकर प्रशासनाला पाठीशी घालत असल्याने मंगेश सातमकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्थायी समितीच्या बैठकीतून निघून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना भाजपाच्या सदस्यांनी खाली बसवले. मात्र यामुळे शिवसेना नागरसेवकांमध्ये असलेली आपसातील नाराजी मात्र सर्वांसमोर आली आहे. मुंबईतील जी/ उत्तर आणि जी / दक्षिण विभागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीला आला असता शिवसेनेचे सदस्य मंगेश सातमकर यांनी सायन प्रतीक्षानगरमधील रखडलेल्या रस्त्याची अवस्था स्थायी समिती समोर सांगितली. या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आल्यानंतर या ठिकाणी मलवाहिनी तसेच पर्जन्य जलवाहिनींची कामे अंर्तभूत न केल्यामुळे मंजूर झालेल्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हे काम अर्धवट बंद पडून असल्यामुळे याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला आहे. त्यामुळे या रस्त्यांचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल सातमकर यांनी केला. तर वरळीतील बी. जी. खेर मार्गावरील काही भाग आजही अर्धवट आहे. यामुळे रस्ताची दैनावस्था झाली असून, शाखेसमोरील रस्ता असा असल्यामुळे नागरिकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे शिवसेना सदस्य आशिष चेंबूरकर यांनी सांगितले.
एस. व्ही. रोडपासून अक्साकडे जाणारा 600 मीटरचा पट्टा अजूनही झालेला नाही, अशी खंत शिवसेनेच्या सदस्या राजूल पटेल यांनी व्यक्त केली. परंतु यावर अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन किंवा रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. उलट स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे मंगेश सातमकर यांनी जागेवरुन उठून जाण्याची तयारी दर्शवली. सातमकर निघून जात असतानाच शिवसेनेतून भाजपात गेलेले जेष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी सातमकर यांना शांत करत पुन्हा आपल्या आसनावर बसवण्यास सुचविले. दरम्यान प्रशासनाने किमान आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तरी द्यावीत. परंतु आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेच न देता अध्यक्षांनी त्यांचे प्रस्ताव मंजूर करून टाकणे योग्य नसल्याची खंत सातमकर यांनी व्यक्त व्यक्त केली आहे. अध्यक्षांनीही प्रशासनाला याबाबत उत्तर देण्यास न सांगितल्यामुळे शिवसेनेच्या इतर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
3 जूनपर्यंत 415 प्रकल्प रस्ते होणार पूर्ण -
मुंबई महापालिकेने हाती घेण्यात आलेल्या 405 प्रकल्प रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत असून, येत्या 3 जूनपर्यंत ही सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होणार असल्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दिले आहे. सध्या 307 रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. पुढील 91 कामे 31 मे पर्यंत आणि उर्वरीत 11 कामे 3 जूनपर्यंत पूर्ण होतील, असे प्रशासनाने म्हटले आहे. प्राधान्यक्रम 1 नुसार हाती घेण्यात आलेल्या 114 रस्त्यांपैकी 92 कामे पूर्ण झालेली आहेत. तर उर्वरीत 22 कामेही 31 मे पर्यंत पूर्ण होतील, प्राधान्यक्रम 2 अंतर्गत हाती घेतलेल्या 268 रस्त्यांपैकी 49 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत 219 रस्त्यांची कामे सुरू असून, त्यातील 79 रस्त्यांची कामे 31 मे पर्यंत पूर्ण होतील, असा दावा त्यांनी केला आहे. तर हमी कालावधीतील 81 रस्त्यांची कामेही 31 मे पूर्वी पूर्ण होतील, असे आश्वासन प्रश्नाकडून देण्यात आले.
Post a Comment