भाजपा व कॉंग्रेसच्या विरोधामूळे राणीबागेतील शुल्क वाढ अर्ध्याने कमी होणार

एकाकी पडल्याने शुल्कवाढीबाबत चर्चा करण्यास शिवसेनेची तयारी
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबईच्या राणीबाग मधील पेंग्विन पाहण्याचे शुल्क व मॉर्निंग पासची दरवाढ करण्यात येणार आहे. हि दरवाढ करण्यासाठी गटनेत्यांच्या तसेच बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. राणीबाग मधील शुल्क वाढीला काँग्रेसने विरोध केला आहे. मात्र हा दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार असतानाच भाजपानेही शुल्कवाढीला विरोध करण्यास सुरुवात केल्याने सत्ताधारी शिवसेना एकटी पडली आहे. स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर न झाल्यास शिवसेनेची नाचक्की होणार असल्याने शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत राणीबागची केलेली दरवाढ अर्ध्याने कमी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या भायखळा राणीबाग मध्ये हम्बोल्ट पेंग्विन कक्ष सुरु करण्यात आले तसेच राणीबाग मधील उद्यान नव्याने बनवण्यात आले. यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला असल्याने हा खर्च वसूल व्हावा म्हणून पेंग्विन पाहण्यासाठी वेगळे शुल्क आकारण्याचा तसेच राणीबागेचे प्रवेश शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार सध्या लहान मुलांसाठी २ रुपये तर प्रौढांसाठी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे ते शुल्क वाढवण्याचा तसेच पेंग्विन पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून शुल्क आकारण्याचा प्रस्ताव होता. यात एकाच कुटुंबातील आई वडील आणि दोन मुलांना १०० रुपये, एका कुटुंबा व्यतिरिक्त एखादा लहान मुलगा किंवा मुलगी असल्यास प्रत्येकी २५ रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जाणार आहे. मुलांसोबत नसलेल्या पती पत्नी व्यतिरिक्त एखादा प्रौढ व्यक्ती किंवा दोन प्रौढ व्यक्ती पेंग्विन पाहण्यास आल्यास त्यांना प्रत्येकी १०० रुपये तर त्यांच्यासह आलेल्या मुलांना प्रत्येकी २५ रुपये शुल्क लागू केले जाणार आहे. तसेच मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांकडून उद्यान प्रशासन दरमहा ३० रुपये शुल्क घेते या पासच्या दरात ५ पटीने वाढ करून १५० रुपये दरमहा शुल्क घेतले जाणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

गटनेत्यांच्या बैठकीनंतर दरवाढीचा प्रस्ताव पालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत आला असता तेथेही शिवसेना व भाजपाच्या सदस्यांची सदस्य संख्या समान असताना आणि विरोधकांची संख्या नगण्य असताना दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. गटनेत्यांच्या तसेच बाजार आणि उद्यान समिती मध्ये दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्या नंतर भाजपाने या दरवाढीला आता विरोध करण्यास सुरुवात केली आहे. पेंग्विन पाहण्याचे शुल्क वाढल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून दरवाढीला विरोध दर्शवला आहे. तसे पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्रही दिले आहे. भाजपा व काँग्रेसने विरोध केला असल्याने स्थायी समितीमधील दोन्ही पक्षांची आणि इतर पक्षांची सदस्य संख्या पाहता प्रस्तावावर मतदान झाल्यास प्रस्ताव परत पाठ्वल्यास सत्ताधारी शिवसेनेची नाचक्की होणार आहे.

विरोधकांना दरवाढ योग्य वाटत नसल्यास र-थायी समितीत चर्चा करावी

हि दरवाढ २३ वर्षांनी झाली आहे. पेंग्विनसाठी आणि राणीबाग साठी खर्च झाला आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विरोधकांना दरवाढ योग्य वाटत नसल्यास स्थायी समितीत त्यावर चर्चा करावी. त्यांना कोणते दर योग्य वाटतात ते स्थायी समोर ठेवावेत. त्यावर चर्चा करून दर निश्चित करू. या प्रस्तावाला केवळ विरोध म्हणून विरोध करू नये असे आवाहन शिवसेनेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केले आहे.

अशी होणार दरवाढ कमी

शिवसेनेने दरवाढीबाबत चर्चा करण्याची भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या मागणीनुसार मॉर्निंग वॉक साठी पासच्या दरात १५० वरून ७५ इतकी तर भाजपाकडून होणाऱ्या विरोधामुळे पेंग्विन पाहण्यासाठीचे शुल्क एका कुटुंबाला १०० वरून ५० रुपये तर एका विद्यार्थ्याला २५ रुपये असलेले शुल्क १० ते १५ रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget