मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका क्षेत्रातील रस्ते व नाल्यांची कामे सध्या प्रगतिपथावर असून या कामांचा दैनंदिन आढावा पालिका आयुक्तांच्या स्तरावर नियमितपणे घेतला जात आहे. याच अंतर्गत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, देवनार, चेंबूर, मानखुर्द, चुनाभट्टी इत्यादी ठिकाणी विविध कामांची पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण, लहान नाल्यांची सफाई तसेच रस्त्या लगतच्या वाहिन्यांची सफाई इत्यादी कामांची पाहणी केली. ही सर्व कामे व्यवस्थितपणे सुरु असून निर्धारित वेळेत ती पूर्ण होतील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
या पाहणी दौ-यादरम्यान पालिका आयुक्तांसमवेत परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, एल विभागाचे सहाय्यक आयुक्त अजयकुमार आंबी, एम / पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे, एम / पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. हर्षद काळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment