पालिकेच्या 'के पश्चिम' विभागाची धडक कारवाई
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या 'के पश्चिम' विभागातील जुहू वर्सेावा लिंक रोड भागात इर्ला नाल्याकडे जाणारा अभिषेक नाला आहे. या नाल्यात व नाल्यालगतच्या ६ मीटरच्या रस्त्यावर सुमारे १०७ अनधिकृत पक्की बांधकामे होती. यातील ४० पक्क्या बांधकामांवर बुधवारी धडक कारवाई करण्यात येऊन ती निष्कासित करण्यात आली. उरलेल्या ६७ बांधकामांवरही गुरुवारी कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती के / पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
यातील काही बांधकामे बहुमजली (तळमजला + १) असल्याचेही त्यांनी सांगितले. परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड यांच्यासह सहाय्यक अभियंता उमेश बोडके, दुय्यम अभियंता महेश पवार, कनिष्ठ अभियंता सचिन माने यांनी ही कारवाई केली.
ही कारवाई करण्यासाठी पोलीस दलाचे विशेष सहाय्य मिळाले. ५ पोलीस अधिका-यांसह २५ पोलीसांचा ताफा या कारवाईदरम्यान उपस्थित होता. या कार्यवाहीसाठी २ जेसीबी, ३ डंपर व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली. या कारवाईत महापालिकेचे २० कामगार – कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
ही अतिक्रमणे हटविल्यानंतर या नाल्याच्या रुंदीकरणाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय नाल्यालगतचा ६ मीटरचा रस्ताही वाहतूकीसाठी खुला होणार आहे, अशीही माहिती गायकवाड यांनी दिली आहे.
Post a Comment