हिरानंदानी रुग्णालयाचा करार रद्द

नवी मुंबई : महापालिका रुग्णालयाच्या जागेत हिरानंदानी हेल्थ केअर कंपनीने सुपर स्पेशालिटी सेवांची आवश्यकता असणार्‍या आजारांवर उपचार करण्याचा मनपाशी करार केला होता. मात्र या करारातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा करार रद्द केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांनी पत्रकारांना दिली.
यामध्ये हिरानंदानी हेल्थ केअर कंपनीने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता परस्पर फोर्टीज कंपनीला ही जागा रुग्णालय चालवण्यासाठी देणे, त्याच प्रमाणे या जागेमध्ये केवळ सुपर स्पेशालिटी सुविधा (उपचार) देण्याचा करार असताना सर्वसाधारण आजारांवरही उपचार केल्याचे निदर्शनास आले आहे. यासह इतर कारणांवरून हा करार रद्द करण्यात आला असून बुधवारपासून नवीन रुग्णांना भरती करू नये, तसेच सध्या जे रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार करून एका महिन्यात रुग्णालयाची जागा खाली करून महापालिकेच्या ताब्यात द्यावी, असे आदेश आयुक्तांनी दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांनी दिली.

तत्कालीन महासभेने शहरातील नागरिकांना सुपर स्पेशालिटी सेवा मिळावी म्हणून हिरानंदानी हेल्थ केअर कंपनीबरोबर २00६ साली करार करून या रुग्णालयातील मोकळे मजले भाड्याने दिले. तेव्हापासून मनपा व हिरानंदानीचा झालेला करार जो वादात सापडला तो अद्यापपर्यंत कायम होता. त्यानंतर सुविधा देण्यावरून वारंवार महासभेत नगरसेवकांनी आवाज उठवल्यावर २00८ साली व नंतर पुन्हा २0१६ साली या कंपनीबरोबर पुरवणी करार करण्यात आला होता. तरीही हा वाद काही संपुष्टात येत नव्हता. ही बाब आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यावर त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये या कंपनीने महापालिकेशी केलेल्या करारातील विविध अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर मागील महिन्यात महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. हिरानंदानीने या नोटिसीला उत्तर दिले नाही. त्यानंतर बुधवारी आयुक्तांनी हिरानंदानीशी केला करार रद्द केला.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget