नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (एसबीआय) या सरकारी बँकेने पेटीएमसह सर्व ई-वॉलेट ब्लॉक केले आहेत. यामुळे नोट टंचाईच्या या काळात मोबीक्विक, एअरटेलमनी आणि पेटीएम या ई-वॉलेटची सेवा वापरणार्या ग्राहकांची अडचण होणार आहे.
एसबीआयने ई-वॉलेट्स ब्लॉक केल्यामुळे ग्राहकांना इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून या एसबीआय खात्यावरील पैसे ई-वॉलेटमध्ये हस्तांतरित करू शकणार नाहीत. ग्राहकांची सुरक्षितता आणि व्यवसाय या कारणांमुळे एसबीआयने हे पाऊल उचलले आहे, असे स्पष्टीकरण एसबीआयने आरबीआयला दिले आहे. पेटीएमने सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने एसबीआयने पेटीएम ब्लॉक करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पेटीएमवरील ही बंदी तात्पुरती असून सुरक्षेच्या कारणांचा आढावा घेऊन ई-वॉलेट सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. एसबीआयने स्वत: एसबीआयबडी वॉलेट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना अन्य ई-वॉलेटवर जाण्यापासून एसबीआय कदाचित रोखत असावी, अशी चर्चा बाजारात केली जात आहे.
Post a Comment