मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तथापि, मुले फक्त शिकत नाही, असे म्हणणे संयुक्तिक नसून १०० टक्के मुले शिकण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करुन शिक्षण पद्धती धोरणाची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.
पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम (माध्यमिक स्तर) व जलद गतीने शिक्षण पद्धती यावर आज दुपारी जयहिंद कॉलेज सभागृह (विधी महाविद्यालयाजवळ), चर्चगेट (पश्चिम), मुंबई येथे अर्धदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस पालिकेच्या शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, सर्व माध्यमिक व निवडक प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि शहर साधन केंद्राचे विषयतज्ज्ञ उपस्थित होते, यावेळी नंदकुमार बोलत होते. या कार्यशाळेस शिक्षण संचालक (माध्यमिक विभाग) नामदेव जरग, उप आयुक्त (शिक्षण) मिलीन सावंत, उप सचिव तथा राज्य प्रकल्प संचालक सुवर्णा खरात, शिक्षणाधिकारी महेश पालकर, कार्यक्रम अधिकारी कांचन जोशी, श्रीनिवास शास्त्री, सिद्धेश्वर चांदेकर हे मान्यवर उपस्थित होते प्रधान सचिव नंदकुमार कार्यशाळेत उपस्थितांशी मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाकडून शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना व प्रकल्प राबवित आहे. शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी प्रशासन अहोरात्र कार्य करीत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व त्या यंत्रणांचा अवलंब केला पाहिजे. शिक्षण देत असताना सर्वांना समान शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण १०० टक्के रोखले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी इयत्ता १ लीत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, ते पहावे. प्रत्येकाने अशा सामाजिक बांधिलकीने काम केले तर १०० टक्के शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल.शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षण देण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य करावे, असे आवाहन शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले उप आयुक्त (शिक्षण) मिलीन सावंत यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येत असलेले विविध उपक्रम / कार्यक्रमाची माहिती दिली. तर शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी प्रस्ताविकपर भाषणात पालिकेच्या शिक्षण विभागाकडून मुलांची पटसंख्या व गुणवत्ता वाढविण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
Post a Comment