दररोज २९ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

११ हजार ४१३ अनधिकृत बांधकामे निष्कासित
एफ उत्तर मध्ये सर्वाधिक १,८४६; तर एम पश्चिम मध्ये १,१९० बांधकामे तोडली
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यासह विविध प्रकारच्या अनधिकृत बांधकामांनाही आळा बसण्याच्या दृष्टीने संबंधित बाबींवर नित्यनेमाने कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. यानुसार एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ हजार ४१३ बांधकामांवर पालिकेने कारवाई केली आहे. या कालावधी अंतर्गत १३ महिन्यांचे ३९५ दिवस होत असून दररोज साधारणपणे २९ अनधिकृत बांधकामांवर पालिकेने निष्कासनाची कारवाई केली आहे, अशी माहिती पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याचे उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी दिली आहे.

पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांवर सुनियोजित पद्धतीने कारवाई करण्याच्या दृष्टीने सुधारित कार्यपद्धती अंमलात आणण्यात आली आहे. या अंतर्गत प्रामुख्याने पालिकेची ७ परिमंडळे व त्या अंतर्गत येणारे २४ प्रशासकीय विभाग यांच्या स्तरावर दर महिन्याला आढावा बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. संबंधित परिमंडळीय उपायुक्त व संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित होणा-या या बैठकांदरम्यान अगोदरच्या महिन्यात करण्यात आलेली कार्यवाहींचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे तसेच पुढच्या महिन्यात करावयाच्या कामांचे सुव्यवस्थित नियोजन देखील करण्यात येत आहे या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गती प्राप्त झाली आहे, असेही ढाकणे यांनी सांगितले आहे

3 हजार 619 निवासी बांधकामावर कारवाई

एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधी दरम्यान पालिकेद्वारे अनधिकृत बांधकामांवर सुनियोजित पद्धतीने तोडकाम कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ हजार ६१९ निवासी स्वरुपाच्या २ हजार ५०६ व्यवसायिक स्वरुपाच्या; तर ५ हजार २८८ झोपड्यांच्या / कच्च्या स्वरुपाच्या बांधकामांवरील कारवाईचा समावेश आहे

एफ उत्तर विभागात सर्वात जास्त कारवाई

अनधिकृत बांधकमांवरील कारवाईमध्ये माटुंगा, शिव, चुनाभट्टी, वडाळा, ऍन्टॉप हिल यासारख्या परिसरांचा समावेश असलेल्या 'एफ उत्तर' विभागात सर्वाधिक म्हणजे १ हजार ८४० बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या खालोखाल चेंबूर, टिळक नगर आदी परिसरांचा समावेश असलेल्या 'एम पश्चिम' विभागात १ हजार १९० बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. तर यानंतर 'आर उत्तर' विभागात १ हजार ९५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. 'आर उत्तर' विभागात प्रामुख्याने दहिसर परिसराचा समावेश आहे

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget