मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – या वर्षी १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ मे २०१७ पर्यंत ३७८.१२ किलोमीटर लांबीचे चर खोदण्याची परवानगी विविध आस्थापनांना पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे यापैकी ३६९.६० किलोमीटरचे चर त्याबाबतचे काम झाल्यानंतर संबंधित रस्ते व्यवस्थितपणे पूर्ववत व वाहतूक योग्य करण्यात आले आहेत.उरलेले ८.६० किलोमीटरचे चर येत्या ३ दिवसात पूर्ववत करा असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांना शनिवारी बैठकीत दिले.
पावसाळ्याच्या काळात रस्त्यांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांची तसेच दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांचे कंत्राटदार यांची प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांनी तातडीने बैठक घ्यावी. या कंत्राटदारांचा साधनसामुग्री, मनुष्यबळ व एकूण क्षमता याच्या उपलब्धतेबद्दल आढावा घेऊन त्यांना पूर्व तयारीत राहण्यासाठी आदेश द्यावेत व त्यांचे संपर्क क्रमांक संबंधित सहाय्यक आयुक्तांना देण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.पावसाळ्याच्या काळात मॅनहोल उघडे असणे, झाडे पडणे, भूस्खलन होणे, धोकादायक इमारती पडणे, यामुळे दुर्दैवी घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घ्या
परिसरांना गजदरबंध उदंचन केंद्रामुळे लाभ होणार
गजदरबंध उदंचन केंद्र ९ जून २०१७ पर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या) यांना दिले आहेत. (पश्चिम उपनगरातील पालिकेच्या 'एच/पश्चिम' व 'के/पश्चिम' या विभागाच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्या दरम्यान साचू शकणा-या पाण्याचा त्वरीत निचरा व्हावा व संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही व्हावी; यादृष्टीने 'गजदरबंध' पातमुखावर पर्जन्यजल उदंचन केंद्र बांधण्यात येत आहे. विलेपार्ले, सांताक्रूज व खार या परिसरांचा पश्चिम भाग तर वांद्रे (प.) व सांताक्रूज (प.) परिसरातील काही भाग आदी परिसरांना गजदरबंध उदंचन केंद्रामुळे लाभ होणार असल्याचा दावा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला आहे
येथे विशेष लक्ष दया
सध्या मुंबईत मेट्रोची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. मेट्रोची कामे सुरु असल्याच्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
Post a Comment