मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणली जाणारी मुंबई पालिका आता उद्यानांसाठी नवी पॉलिसी बनवण्याचा निर्णय घेतला आहे उद्यानांमध्ये लोकांची मागणी नसताना अनाठायी अनेक कामे व बांधकामे केली जातात. या बांधकामामुळे स्थानिक रहिवाश्याना आणि मुलांना त्या उद्यानाचा लाभ घेता येत नाही. यामुळे मुंबईमधील उद्यानांचा नागरिकांना व मुलांना लाभ घेता यावा म्हणून नव्याने पॉलिसी करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आला आहे.
मुंबईच्या मुलुंड येथील उद्यानाच्या नुतणीकरणाचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत आला होता. याबाबत बोलताना भाजपाचे सदस्य प्रभाकर शिंदे यांनी मुलुंड येथील चिंतामण देशमुख उद्यानात स्केटिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. याचा वापर खाजगी संस्था करते व मुलांकडून शुल्क आकारते. हा ट्रॅक दोन महिन्यात तुटला आहे. या उद्यानावर ४ कोटी पैकी ३ कोटी रुपये खर्च केले असले तरी स्थानिक नागरिक कामावर समाधानी नाहीत. येथील ३५० नागरिकांनी या उद्यानातील कामाविरोधात असमाधानी असल्याचे पत्र पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले आहे. यामुळे पालिकेने या उद्यानाच्या कामाची पाहणी करावी असे आवाहन शिंदे यांनी केले. मनोज कोटक यांनी उद्यानात स्केटिंग रिंग उभी केली जाणार आहे तेही कोणाला चालवायला देणार का ? नागरिकांनी उद्यानात अश्या काही मागण्या केल्या आहेत का ? असे प्रश्न उपस्थित केले.
राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी घाटकोपर पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदानाचा कागदोपत्री ताबा पालिकेकडे असला तरी त्याचा ताबा एका खाजगी संस्थेने आपल्याकडे ठेवला आहे. या संस्थेने या मैदानाचे विभाजन केले आहे. हे मैदान संस्थेने आपली खाजगी प्रॉपर्टी केली आहे. येथे मुलांना खेळण्यास मज्जाव केला जात आहे. यामुळे पालिकेने मैदानातील विभाजन काढून मैदानाचा ताबा आपल्याकडे घ्यावा अशी मागणी केली. काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी उद्यानामध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नसते उद्यानात बांधकाम जास्त असते यामुळे उद्यानाचा विकास कंत्राटदाराला डोळ्यासमोर ठेवून न करता स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार करावा अशी मागणी केली. भाजपच्या राजश्री शिरवडकर यांनी उद्यानात सुरक्षा रक्षक नसतात, सुरक्षा रक्षक असल्यास त्या सुरक्षा रक्षकालाच सुरक्षा देण्याची गरज पडते असे सांगून उद्यानासाठी चांगली सुरक्षा असणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी पाणी विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून उद्यान विभाग चालवला जातो हा उद्यान विभाग पाणी विभागाकडून वेगळा करावा अशी मागणी केली. यावर पालिका अतिरिक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी उद्यानांमध्ये मुलांना खेळायला जागा कमी आणि बांधकामे जास्त असल्याचे मान्य केले. उद्याने मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध झाली पाहिजेत यासाठी मोकळी जागा किती असावी आणि बांधकामे किती असावी याबाबत पॉलिसी बनवणे गरजेचे आहे. यासाठी उद्यान विभागाकडून नवी पॉलिसी बनवून स्थायी समिती व सभागृहापुढे सादर केली जाईल असे कुंदन यांनी सांगितले.
Post a Comment