मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होत असून पालिका या अतिक्रमणांवर कारवाई करत आहे फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसाचा वेळ अपुरा पडतो. त्यामुळे रात्रीही महापालिकेचा अतिक्रमण निमुर्लन विभाग सुरू ठेवावा, अशी सूचना भाजपने प्रशासनाला केली आहे. रात्रीचे हे विभाग सुरू ठेवल्यास अवैध बांधकामे तसेच फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवता येईल असा दावा भाजपने केला आहे.
रस्त्याच्या बाजूला पदपथ अडवून बसणारे फेरीवाले आणि अवैध बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेले पालिकेचे कर्मचारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कार्यरत असतात. त्यानंतर संध्याकाळी फेरीवाल्यांची संख्या वाढते. संध्याकाळच्या वेळेस मुंबईतील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असते. तसेच मुंबईच्या विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळेस अवैध बांधकामे करण्याचे, अवैध जलवाहिन्या टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर उपाय म्हणून परवाना, नियंत्रण, अतिक्रमण निर्मुलन, पाणी या विभागांतील कर्मचाऱ्यांचा कार्यकाल दिवसापुरता न ठेवता दोन किंवा तीन पाळ्यांमध्ये ठेवल्यास, हे वाढते प्रकार थांबण्यास मदत होईल, अशी ठरावाची सूचना भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. तसेच पालिकेतर्फे मालमत्ता कर, पाणी, चाकपट्टी यासह विविध प्रकारचे कर वसुल केले जातात. हे कर भरणा करणारी केंद्रे संध्याकाळी साडेपाचपर्यंतच सुरू असतात. त्यामुळे लाखो मुंबईकरांना या वेळेत कर भरणा शक्य होते असे नाही. त्यामुळे ही केंद्रेही संध्याकाळी आणखी काही वेळ सुरू ठेवल्यास मुंबईकरांना सोयीचे ठरणार असून पालिकेच्या महसुलातही वाढ होईल, असेही त्यांनी सूचवले आहे.
Post a Comment