११ जानेवारी २०१७ रोजी सुधार समितीत सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाच्या नगरविकास विभागाने २२ जानेवारी २०१६ रोजी पालिकेला पत्र पाठवून महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी पालिका प्रशासनाकडून सदर प्रस्ताव पालिका सभागृहात मंजुरीसाठी आणला होता. शिवसेनेच्या नगरसेविका अश्निनी मते यांनी प्रस्ताव मांडला. सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी अनुमोदन दिले. भूकर क्र. ५०१,५०२ पैकी आणि भूकर क्र. १४९५ धारण करणारा महापौर बंगला व इतर उपयोगिता असलेला, अंदाजे ११,५५१.०१ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूभाग, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचे भव्य स्मारक उभारण्याकरीता शासनाने स्थापन केलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक या सार्वजनिक न्यासास एक विशिष्ट बाब म्ह्णून रु. १/- इतके प्रतिवर्ष नाममात्र भुईभाडे आणि इमारतीची कोणतीही राखीव किंमत न घेता महानगपालिकेच्या मंजुरीच्या दिनांकापासून ३० वर्षाच्या कालावधीकरीता देण्यास राज्य शासनाने मुंबई महानगरापलिका अधिनियम, १८८८ च्या कलाम ९२(डड-१) अन्वये सुचविल्याप्रमाणे मंजुरी देण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
प्रस्तावाबाबत बोलताना महापौर स्नेहल आंबेकर यांनी सदर प्रस्ताव आपल्या कारकिर्दीत झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून ही गोष्ट आपणाला अभिमानास्पद असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या या राष्ट्रीय स्मारकात मूळ बंगल्यात कुठेही धक्का न लावता बंगल्याच्या आतील भागात विविध दालने उभारण्यात येणार आहेत. बाळासाहेबांच्या प्रसिद्ध व्यंगचित्रांचे दालन, दुर्मिळ छायाचित्र, प्रसिद्ध लेख आदींचा समावेश यांमध्ये असणार आहे. नव्या महापौरांचे निवासस्थान कुठे असेल असे विचारले असता महापौरांनी या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगत प्रशासनाकडून जागा निश्चित झाल्यावर त्याबाबत निर्णय घेला जाईल असे सांगतिले. दरम्यान, नवीन महापौरांचा बंगला कुठे होणार याबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र सध्या भायखळा येथील राणीबागेतील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला किंवा पेडर रोड वरील आयुक्तांचा बंगला हा नव्या महापौरांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
Post a Comment