यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्तीमुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ता स्थापन करण्याची कोणालाही थेट संधी न दिल्याने महापौर कोणाचा बनेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि भाजपामधील अनेक नगरसेवक महापौर पदासाठी फील्डिंग लावून बसले आहेत. अश्यातच शिवसेनेतील महापौरपदाचे भक्कम दावेदार असलेले अनुभवी नगरसेवक यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे महापौरपदाचे आणि स्थायी समिती अध्यक्षपदाचे स्वप्न भंगले आहे. यशवंत जाधव हे अनुसूचित जाती मधील असल्याने त्यांना गटनेते बनवून इतर महत्वाच्या पदापासून दूर ठेवल्याची चर्चा सुरु आहे.
मुंबई महापालिकेत सन 2012 च्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या अडीच वर्षाच्या काळात महापौर पद अनुसुचित जातीच्या महिलांसाठी राखीव होते. त्यामुळे यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना महापौरपद मिळावे म्हणून यशवंत जाधव यांनी आपली शक्ति पणाला लावली होती. याच वेळी यामिनी जाधव यांना महापौरपद मिळू नये म्हणून महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांनीही मातोश्रीवर लॉबिंग केली होती. त्यामुळे महापौर पदासाठी प्रबळ दावेदार असतानाही शिवसेना नेतृत्वाने यामिनी जाधव यांच्या ऐवजी स्नेहल आंबेकर यांना महापौरपद दिले होते.मुंबई महापालिकेच्या 2107 च्या निवडणुकीत शिवसेनेला 84 जागा जिंकता आल्या आहेत. शिवसेना पालिकेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता जास्त आहे. सध्या महापौरपद खुल्यावर्गासाठी असल्याने जाधव हे सुद्धा महापौरपदाच्या शर्यतीत होते. स्थायी समिती, प्रभाग समिती, स्थापत्य समिती, बाजार व उद्यान समितीतील कामकाजाचा अनेक वर्षाचा अनुभव असलेल्या जाधव यांना महापौरपदावर शिवसेना बसवेल. महापौरपद नाही तर जाधव यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद तरी मिळेल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र शिवसेनेने जाधव यांची महापालिकेच्या गटनेतेपदी नियुक्ति करून त्यांना महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदापासून दूर ठेवले आहे. यामुले आता शिवसेनेचा मुंबई महापालिकेत महापौर बसल्यास जाधव यांना सभागृह नेतेपदाची धुरा सांभाळावी लागेल किंवा शिवसेनेचा महापौर नाही झाला तर त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून काम पहावे लागणार आहे.
महापौरपदाच्या स्पर्धेतून पत्ता कट झाल्यानंतर आता शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर, विश्वनाथ महाडेश्वर, रमेश कोरगावकर आणि रमाकांत रहाटे यांच्यात महापौरपदाची चुरस निर्माण झाली आहे. यावेळी सुद्धा महिलेलाच महापौरपद देण्याचा शिवसेनेने निर्णय घेतला तर राजूल पटेल, शुभदा गुडेकर आणि किशोरी पेडणेकर यांच्यात महापौरपदाची स्पर्धा असेल असे सुत्रांनी सांगितले. माजी आमदार आणि माजी महापौर विशाखा राऊत यांनाही पुन्हा महापौरपदाची संधी मिळू शकेल असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.
Post a Comment