मुख्यमंत्र्यांकडून कारवाई झाली तरच उपोषण सोडू -
मुंबई - राज्य सरकारच्या पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मध्ये मनमानी कारभार सुरु आहे. या मनमानी कारभाराची चौकशी करावी म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशनापर्यंत सहा वेळा उपोषण करण्यात आली मात्र सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने समतादूत संघर्ष समिती द्वारे मुंबईच्या आझाद मैदानात २३ जुलै पासून उपोषण सुरु केले असल्याची माहिती अनिता कोलते यांनी दिली. जो पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला भेट देत नाहीत आणि बार्टीमधील मनमानी कारभाराची चौकशी करत नाहीत तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे अनिता कोलते यांनी सांगितले. बार्टी संस्थेमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, इत्यादी महापुरुषांचे विचार हद्दपार केले जात आहेत, बार्टीमधील ६५० समतादूतांना बेरोजगार करण्यात आले आहे, महासंचालक राजेश ढाबरे यांनी पदाचा गैरवापर करत बदल्या व पदोन्नत्या केल्या आहेत याला स्थगिती द्यावी, समतादूत ब्रिक्स इंडिया प्रा. लि. यांना २९ टक्के वाढीव दराने विकण्यात आले आहे, महापुरुषांची विनामूल्य पुस्तके १५ टक्क्याने विकली जात आहेत, नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला म्हणून महासंचालकांकडून अब्रुनुकसानीचा दावा व इतर प्रकारे धमकावले जात असल्याची चौकशी करावी, राजेश ढाबरे यांनी त्यांच्या वैयक्तिक गायनाच्या कार्यक्रमासाठी समतादूतांचा वापर केला अश्या १२ मागण्यांसाठी उपोषण केले जात आहे.
या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री, राज्यमंत्री, सचिव, पोलीस महासंचालक यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. बार्टीमध्ये चाललेल्या मनमानी कारभाराची चौकशी करावी यासाठी सहा वेळा उपोषणे सुद्धा केली. नागपूर अधिवेशनावर मोर्चाही काढण्यात आला यादरम्यान सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याशी भेट झाली. मात्र हे दोन्ही सामाजिक न्याय मंत्री आम्हाला न्याय देऊ शकलेले नाहीत. सामाजिक न्याय मंत्री त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या विभागाची चौकशी करण्यास अपयशी ठरत असल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागितली असल्याचे अनिता कोलते यांनी सांगितले.
Post a Comment