मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना विविध प्रलोभने दाखवून गैरप्रकार होत असतात. हे थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून यावर्षी प्रथमच अनधिकृतपणे होणारे पैसे वाटप रोखण्यासाठी कोस्टगार्ड, चार्टड फ्लाइट, रेल्वे, हेलिकॉप्टर, हवालामार्ग होणारे व्यवहार यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच १५ आयकर अधिकाऱ्याची फौज उमेदवारांच्या दैनंदिन सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवून असणार असल्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज पत्रकार परिषेदेत सांगितले. या पत्रकार परिषेदेत पोलीस अतिरिक्त आयुक्त देवेन भारती, निवडणूक आयोगाचे सचिव चंद्रशेखर चन्ने, पालिका आयुक्त अजोय मेहता तसेच बँकिंग अधिकारी उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या पालिका निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.
मतदारांना निर्भयपणे मतदान करणे शक्य व्हावे यासाठी मुंबईतील संवेदनशील मतदार संघांची यादी तयार करण्यात येत आहे. सर्व राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले. उमेदवारांच्या प्रत्येक दिवसाच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात येणार आहे. उमेदवारांकडून जे प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे ते वृत्तपत्रातून जाहीर केले जाणार असून त्याचबरोबर मतदान केंद्राबाहेरही त्याच्या प्रति जनतेच्या माहितीसाठी लावण्यात येणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न
सन २०१२ च्या पालिका निवडणुकीत केवळ ४२ टक्के मतदान झाले होते ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असून भारतातील सर्वात मोठया महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ती शोभादायक नसल्याचे सांगत सहारिया यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार असल्याचे संगितले. यासाठी खाजगी सोसायटया, वृत्पत्रे,सोशल मिडिया,शाळा कोलेजांच्या माध्यमातून प्रचार केला जाणार आहे.
तीन दिवस दारूबंदी
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होत आहे यावेळी मतदारांना दारूचे आमिष दाखविणे शक्य होवू नये तसेच या प्रसंगी कोणतीही कायदा-सुव्येवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता २० फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी या दोन दिवसांसह निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजेच २३ फेब्रुवारीला दारूबंदी घोषित करण्यात आली आहे.
Post a Comment