‘दंगल’…गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेता आमिर खानच्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगत आहे.
विविध कारणांनी ‘दंगल’ चर्चेत आला हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. या सर्व चर्चांच्या वातावरणात ‘दंगल’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमधील उत्सुकतेचे परमोच्च शिखर गाठले आहे यात शंकाच नाही. चित्रपटाची सुरूवात कुस्तीच्या सामन्याने होते. या प्रसंगाला दलेर मेहंदी यांच्या आवाजातील ‘दंगल’च्या शीर्षकगीताची मिळालेली जोड आणि पडद्यावर दिसणारे तालमीतले पैलवान चांगलीच वातावरणनिर्मिती करतात. चित्रपटाचे कथानक जसजसे पुढे सरकत जाते तसतसा बदल पात्रांमध्ये दाखवताना कुस्तीचे बदलते तंत्रसुद्धा बदलल्याचे पाहायला मिळते. भारतातील हरियाणा आणि आसपासच्या प्रांतामध्ये कुस्तीविषयी असलेल्या वातावरणाचा अचूक वेध घेत, त्यातील बरेच बारकावे टिपत अभ्यासू वृत्तीने या चित्रपटातील दृश्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात ‘म्हारी छोरीया छोरोंसो कम है के..?’ असं म्हणणाऱ्या आमिर खानने महावीर सिंग फोगट यांची भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे.चित्रपटाच्या सुरुवातीला पिळदार शरीरयष्टीमध्ये पडद्यावर येणारा आमिर काही क्षणांनी वयात झालेला बदल दर्शवण्यासाठी एका वेगळ्याच आणि असंतुलित शरीरयष्टीच्या रुपात प्रेक्षकांसमोर येतो. कुस्तीच्या आखाड्यातून काढता पाय घेतल्यानंतरही या खेळाप्रती असलेली निष्ठा दाखवताना आमिरने उत्तम अभिनय सादर केला आहे. पण, वयस्कर रुपातील महावीर सिंग फोगट साकारत असलेला आमिर ज्यावेळी पडद्यावर येतो तेव्हा मात्र त्याचे कान अनेकांचे लक्ष वेधतात. वाढते वय दाखवण्यासाठी शरीरयष्टीत केलेल्या बदलासोबतच आमिरच्या कानांमध्येही काही बदल दर्शविण्यासाठी करण्यात आलेले प्रयोग खटकतात.
Post a Comment