अनधिकृत फेरीवाल्यांकडील फळे, भाज्या, अन्नपदार्थ, सरबत इत्यादी जप्त व नष्ट
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याची प्रतिबंधात्मक कारवाईमुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे राबविण्यात येणा-या सर्वेक्षणादरम्यान अनेक ठिकाणी अन्नपदार्थ , पेयपदार्थ विकणा-या फेरीवाल्यांकडील बर्फ, पेय, अन्न, फळे, भाज्या इत्यादी निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने हे पदार्थ जप्त करुन नष्ट करण्यात आले आहेत. तसेच अतिसाराचा काही प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आलेल्या ७ विभागांसह सर्वच विभागांमध्ये जनजागृतीच्या दृष्टीने गृहभेटी, आरोग्य संवाद ओआरएस पाकिटांचे व क्लोरिन गोळ्यांचे वितरण इत्यादी कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे.
पालिकेच्या एम पूर्व, एम पश्चिम, एच पूर्व, एल, एन, पी उत्तर, आर उत्तर इत्यादी विभागांमध्ये अतिसाराचा काही प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे याच विभागांमध्ये बर्फ व पाणी नमूने देखील बाधीत असल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सर्व विभागांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ , पेयपदार्थ विक्रेते तसेच निकृष्ट खाद्यपदार्थ इत्यादींवरील प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच जनजागृतीपर कार्यवाही करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत यानुसार या ७ विभागांसह २४ प्रशासकीय विभागांमध्ये गृहभेटींचा कार्यक्रम व आरोग्य संवाद हा उपक्रम जनजागृतीच्या दृष्टीने सुरु करण्यात आला आहे. यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने सर्वेक्षण देखील सुरु करण्यात आले आहे. तसेच आवश्यक तेथे 'ओआरएस'ची पाकिटे व 'क्लोरिन' गोळ्यांचे वितरण देखील करण्यात येत आहे. ही कार्यवाही यापुढेही सुरूच राहणार आहे, अशीही माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. केसकर यांनी दिली आहे. पालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये आतापर्यंत २ हजार ५७१ किलो मिठाई (गोड पदार्थ), ९ हजार ९६६ किलो इतर अन्नपदार्थ, ११ हजार ७५६ लिटर पेयपदार्थ आणि ५ हजार ६०३ किलो फळे ,भाज्या इत्यादी आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कार्यवाही अंतर्गत जप्त करुन नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून ५ हजारांपेक्षा अधिक फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
उघडे पदार्थ खाऊ नयेत - पालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमून्यांमध्ये आढळून आलेले इ-कोलाय जीवणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नये, बाहेरील पाणी - सरबत – उसाचा ,फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी - भेळपुरी सारखे पदार्थ खाणेही टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत; घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या - फळे स्वच्छ धुऊन खावीत आणि वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.
Post a Comment