देशातील जलवितरण व्यवस्थेत पहिल्यांदाच एवढा मोठा 'व्हॉल्व'
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या 'पाणी पुरवठा प्रकल्प' खात्याद्वारे गुंदवली ते भांडूप संकुल या जलबोगद्यावर ८ हजार किलो वजनाची व ९ हजार ६८० आटे असणारी प्रचंड मोठी झडप कापूरबावडी येथे बसविण्याचे काम हाती घेतले असून १२.५० फूट व्यास असणारी ही झडप केवळ मुंबई पालिकेच्या इतिहासात नव्हे, तर देशाच्या जलवितरण व्यवस्थेच्या इतिहासात देखील पहिल्यांदाच बसविण्यात येत आहे. या झडपेमुळे गुंदवली ते भांडूप संकुल हा १५.२० किलोमीटर लांबीचा जलबोगदा 'गुंदवली ते कापुरबावडी' अथवा 'कापुरबावडी ते भांडुप' अशा दोन भागांमध्ये विभागणे तांत्रिकदृष्ट्या आता शक्य झाले आहे. यामुळे या दोन भागांपैकी कुठल्याही एका भागात परिरक्षणाचे काम उद्भवल्यास दुसरा भाग कार्यान्वित ठेऊन पाणी पुरवठा सुरु ठेवणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त रमेश बांबळे यांनी दिली
गुंदवली येथून भांडूप संकुल येथे पाणी वाहून नेण्यासाठी पालिकेने डिसेंबर-२०१६ मध्ये नवा जलबोगदा कार्यान्वित केला आहे. या जलबोगद्यामध्ये परिरक्षणाचे एखादे काम उद्भवल्यास १८ फूट व्यासाचा ५.५० मीटर व १५.२० किलोमीटर लांबीचा हा जलबोगदा पूर्णपणे पाणी विरहीत करणे आतापर्यंत आवश्यक होते. यामुळे गुंदवली येथून भांडूप संकुल येथे करावयाच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होती.पालिकेच्या 'पाणी पुरवठा प्रकल्प'या खात्याद्वारे या जलबोगद्यामध्ये कापूरबावडी येथे 'बटरफ्लाय व्हॉल्व' बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या झडपेमुळे भविष्यात परिरक्षण उद्भवल्यास त्या दरम्यान जलबोगद्याचा निम्मा भाग सुरु ठेवणे व आधीच्या जलवाहिनीचा वापर करुन पाण्याचे वहन करणे शक्य होणार आहे. ज्यामुळे साहजिकच दैनंदिन जलवितरण व्यवस्था कमीतकमी परिणाम होऊन सुरुळीत पद्धतीने सुरु ठेवणे शक्य होणार आहे. ८ हजार किलो वजनाची झडप बसविण्यासाठी १२ हजार किलो वजनाची क्रेन वापरण्यात आली आहे या झडपेला ९ हजार ६८० आटे असून ही झडप उघडण्यासाठी ९ तास, तर बंद करण्यासाठी ९ तास एवढा वेळ लागणार आहे. पालिकेच्या जलबोगद्यामध्ये पाण्याचा दाब हा साधारणपणे प्रत्येक चौरस सेंटीमीटरला १६ किलो एवढा असून असतो. प्रत्येक चौरस सेंमीला २४ किलो एवढी क्षमता असणारी झडप जलबोगद्यात बसविण्यात आली आहे. या बटरफ्लाय झडपेची एकूण किंमत ९ कोटी रुपये एवढी आहे, अशीही माहिती उपायुक्त बांबळे यांनी दिली
येत्या 9 एप्रिलपासून 10 टक्के पाणीकपात पालिका मागे घेणार - उपायुक्त रमेश बांबळे
कापूरबावडी येथे बटरफ्लाय झडप बसविण्याचे काम गेल्या २५ मार्च पासून हाती घेण्यात आलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या तात्पुरत्या स्वरुपात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात ९ एप्रिल पासून मागे घेण्यात येईल असेही पालिका उपायुक्त रमेश बांबळे यांनी सांगितले आहे.
कापूरबावडी येथे बटरफ्लाय झडप बसविण्याचे काम गेल्या २५ मार्च पासून हाती घेण्यात आलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या तात्पुरत्या स्वरुपात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात ९ एप्रिल पासून मागे घेण्यात येईल असेही पालिका उपायुक्त रमेश बांबळे यांनी सांगितले आहे.
Post a Comment