मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – दादर, माहिम परिसरातील सेनापती बापट मार्गालगतच्या पदपथांवर उद्भवलेल्या अतिक्रमणांवर पालिकेच्या 'जी उत्तर' विभागाद्वारे धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान ८० अनधिकृत झोपड्या / शेड हटविण्यात आल्याने रस्ते व पदपथ मोकळे झाले आहेत. यामुळे पादचा-यांना पदपथांवरुन आवागमन करणे अधिक सुकर होण्यासोबतच रस्त्यावरील वाहतूक मोकळी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती 'जी उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
परिमंडळ २ चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनात 'जी उत्तर' विभागात अनधिकृत फेरीवाले, शेडधारी अनधिकृत विक्रेते, अनधिकृत झोपड्या इत्यादींच्या विरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये दादर - माहीम परिसरातील सेनापती बापट मार्गावरील अनधिकृत व्यवसाय, अनधिकृत झोपड्या आणि अतिक्रमणांवर काल व आज याप्रमाणे सलग दोन दिवस कारवाई करण्यात आली रस्ते व पदपथ मोकळे करण्यात आले आहेत, असेही सहाय्यक आयुक्त बिरादार यांनी सांगितले आहे. ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील ३४ पोलीस कर्मचा-यांचे विशेष सहकार्य पालिकेला लाभले होते. यामध्ये १० महिला पोलीस कर्मचा-यांचा समावेश होता. या कारवाईसाठी पालिकेचे ४९ कामगार – कर्मचारी - अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. तसेच ही कारवाई यशस्वीपणे करण्यासाठी ४ डंपर / लॉरी देखील वापरण्यात आल्या, अशीही माहिती बिरादार यांनी दिली आहे.
Post a Comment