भारिपचे कपबशी चिन्हावर 49 उमेदवार
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाने कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती न करता डाव्यांना सोबत घेऊन आघाडी केली आहे. आघाड़ी 103 जागा लढवणार असून यातील 49 जागांवर भारिपचे उमेदवार रिंगणात आहेत. भाजपशी युती असलेल्या आठवले गटाच्या रिपाइंचे उमेदवार ज्या वॉर्डात निवडणूक लढवत आहेत, अशा बहुतांशी ठिकाणी भारिपनेही उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या दोन्ही गटात मतांचे विभाजन होणार असल्याचे चित्र आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने चौरंगी लढत होणार. भारिपने कोणत्याही मोठ्या पक्षासोबत फरफटत न जाता डाव्यांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेऊन काही महत्वाच्या जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारिपच्या 57 जागांवर अर्ज भरले होते. मात्र विविध कारणाने आठ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आता 49 उमेदवार रिंगणात आहेत. बाद झालेल्या 8 उमेदवारांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने 3 उमेदवार, घराजवळ शौचालय प्रमाणपत्र न दाखवल्याने 5 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे 49 जागांवर उमेदवारी अर्ज वैध ठरले असून कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश भारतीय यांनी दिली. तसेच आघाडीत असलेल्या डाव्यांनी 30 जागांवर तर तर आनंदराज आंबेकर यांच्या रिपब्लिकन पक्षाने 24 जागांवर उमेदवारी अर्ज भरले आहेत. बहुतांशी ठिकाणी रिपाइंचे उमेदवार उभे आहेत, तेथे भारिपनेही अर्ज भरले आहेत. पिपल्स रिपब्लिकन पक्ष काँग्रेसवर नाराज आहे, त्यामुळे त्यांचे उमेदवार ही उभे असल्याने गटातटात दलित मतांचे विभाजन होणार आहे. त्याचा फायदा कोणत्याही एका पक्षाला होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Post a Comment