मुंबई / प्रतिनिधी -
काँगेसमधील वाद उफाळून आला असून अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते रविवारी (२९ जानेवारी) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम आणि गुरुदास कामात यांच्यातील वादामुळे काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. यामुळे अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांना आपल्याला तिकीट मिळेल कि नाही याची शाश्वती नसल्याने अनेकांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. काँग्रेस सोडणाऱ्यांमध्ये माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. आंबेरकर हे कामत गटाचे मानले जातात. काही महिन्यापूर्वी त्यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवण्यात येऊन त्यांच्या जागी भाजपातून काँग्रेसमध्ये आलेले प्रवीण छेडा यांची नेमणूक करण्यात आली होती. २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष
यशोधर फणसे यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी देऊन लढवले जाणार होते. परंतू आंबेरकर यांनी या प्रस्तावाला विरोध करत दुसऱ्या वॉर्ड मधून उमेदवारी मागितली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेपासून गुरुदास कामत लांब राहणार असल्याने त्यांना मानणाऱ्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्याना निवडणुकीची तिकिटे मिळण्याची शक्यता नसल्याने येणाऱ्या काळात आणखी काही जण काँग्रेसला सोडचिट्ठी देणार असल्याचे वृत्त आहे.
Post a Comment